Digital satbara mahabhumi: नमस्कार मित्रांनो, सातबारा म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी असल्याचा पुरावाच आहे. आता सातबारा उताऱ्यामध्ये संबंधित शेतकऱ्याकडे किती एकर शेती आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते. यासोबतच ती जमीन कोणाच्या मालकी हक्काची आहे याची देखील माहिती सातबारा उताराद्वारे मिळवली जाते.
त्यामुळे सातबारा उतारा जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता अनेकदा सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता देखील सातबारा उतारा असणे आवश्यक असते. मात्र, काही वेळा हा सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्याला तलाठी कार्यालयामध्ये जावे लागते आणि या दरम्यान शेतकऱ्यांचा वेळ देखील वाया जातो.

पण आता सरकारमार्फत या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोठा बदल करण्यात आला आहे. आता शेतकरी त्याचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने तसेच डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून मिळवू शकतो. हा बदल सरकारमार्फत ऑगस्ट २०२१ पासून लागू करण्यात आला आहे. या दिवसापासून सर्वसामान्य शेतकरी बांधव डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाइन सातबारा उतारा कोणत्याही कामासाठी वापरू शकतो आणि याची सरकारने परवानगी देखील दिली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना आता सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता अशा परिस्थितीत शेतकरी बांधव त्याच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या मदतीने आपण ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढू शकतो. तर आता हा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कसा काढायचा, याबद्दलच्या स्टेप्स आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
ऑनलाईन सातबारा कसा काढायचा?
तर शेतकरी मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा कसा काढू शकता. आता याबद्दलच्या स्टेप्स आणि सविस्तर माहिती वाचून तुम्ही अगदी सहज पद्धतीने तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे हा सातबारा ऑनलाईन पद्धतीने काढू शकता आणि शासकीय कामांसाठी वापरू शकता.
- शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सरकारच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला “Digital Signed 7/12” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही या वेबसाईटवर आधी रजिस्ट्रेशन केलेले नसेल, म्हणजेच पहिल्यांदाच ऑनलाईन सातबारा उतारा काढत असाल, तर तुम्हाला “OTP Based Login” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर येथे एंटर करावा लागेल. क्रमांक टाकून झाल्यानंतर “SEND OTP” या पर्यायावर क्लिक करा.
- आता यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो तुम्हाला येथे व्यवस्थितपणे भरायचा आहे.
- शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी केलेले ७/१२ (सातबारा), डिजिटल स्वाक्षरी केलेले ८अ, डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड, रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्ट्री (भरणा इतिहास), पेमेंट स्टेटस (भरणा स्थिती) हे सर्व पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी केलेल्या ७/१२ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल, ज्या ठिकाणी तुम्हाला “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.” असे लिहिलेले दिसेल. याचा अर्थ असा की सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाइटवर पंधरा रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच सातबारा उतारा काढत असाल, तर तुम्हाला किमान पंधरा रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. म्हणजेच, या वेबसाईटमध्ये सातबारा उतारा काढण्यासाठी बॅलन्स जमा करावे लागेल. आता हे बॅलन्स कसे जमा करायचे हे सर्वप्रथम समजून घेऊया.
सातबारा उतारा काढण्यासाठी बॅलन्स कसे जमा करावे
- शेतकरी मित्रांनो, आता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिचार्ज अकाउंट हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचा आहे.
- आता येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी वेगवेगळे पर्याय देण्यात येतील, जसे की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम यूपीआय, इंटरनेट बँकिंग. यापैकी कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही पंधरा रुपयांचे रिचार्ज करू शकता.
- आता रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला आपोआप सातबारा उताऱ्याच्या पानावर पुनर्निर्देशित केले जाईल.
- आणि या पेज वर तुम्हाला पंधरा रुपये जमा झालेले दिसतील.
- तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे, ते म्हणजे ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढणे. हे काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटच्या पेजवर विचारलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे.
- आता सर्व माहिती भरून झाल्यानंतर, शेवटी तुम्हाला ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ‘डाउनलोड सातबारा’ हा पर्याय येईल. तेथे क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमचा सातबारा उतारा अगदी यशस्वीरित्या डाउनलोड होईल. या उताऱ्यावर स्पष्टपणे नमूद केलेले असेल की हा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून काढलेला सातबारा आहे आणि यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही सही किंवा शिक्क्याची आवश्यकता भासणार नाही.